प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा को-ऑपरेटीव्ह बँकेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिरच्या कै. अर्जुनराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कोरोनामुळे नियमित पद्धत व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सभा घेण्यात आली.
प्रारंभी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली. 2019-20 च्या लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. बँकेला यावषी निव्वळ नफा 2 कोटी 50 लाख रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे इनचार्ज जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर यांनी वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक, नफा विभागणी, अंदाजपत्रक, घटना दुरुस्ती व अन्य विषयांचे वाचन केले.
बँकेचे सभासद मालोजी अष्टेकर, दत्तात्रय नाकाडी, अशोक कांबळे, अर्जुनराव गौंडाडकर, अनंत पाटील, देवकुमार बिर्जे, मोतेश बार्देशकर व इतरांनी चर्चेमध्ये भाग घेऊन अहवालाला मंजुरी दिली. त्यावेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, दीपक दळवी, बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, सुशिलकुमार खोकाटे, विनोद हंगीरकर, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, लक्ष्मण नाईक व सभासद उपस्थित होते. व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी आभार मानले.