पत्रकार परिषदेत माहिती : राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे विविध सेवा उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या काळातही मराठा को-ऑप. बँकेने आपला प्रगतीचा आलेख उंचावला आहे. मागील आर्थिक वर्षात संस्थेला 2 कोटी 50 लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी मागील वषीच्या तुलनेत ठेवींमध्ये 13.5 कोटी तर सोने तारणमध्ये 3 कोटींची वाढ झाली आहे. यावषी रिझर्व्ह बँकेने लाभांश वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सभासदांना 15 टक्के लाभांश मिळावा यासाठी रिझर्व्ह बँकेशी पाठपुरावा करीत असल्याची माहिती संचालक मंडळाने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली.
प्रारंभी चेअरमन दिगंबर पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संचालक बाळासाहेब काकतकर म्हणाले, मराठा बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांच्या तोडीला तोड देत आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, एसएमएस व एटीएम सेवा दिली आहे. बँक सामाजिक कार्यात अग्रेसर असून दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे 11 हजार 937 सभासद असून 130 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे आहेत. बँकेने 97 कोटींची कर्जे वाटली आहेत. सध्या बँकेकडे 197 कोटींचे खेळते भांडवल असल्याचे सांगण्यात आले.
व्हा. चेअरपर्सन नीना काकतकर यांनी आभार मानले. यावेळी संचालक बाळाराम पाटील, लक्ष्मण होनगेकर, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, रेणू किल्लेकर, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक, मुख्य शाखेचे व्यवस्थापक गजानन हिशोबकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.