प्रतिनिधी / बेळगाव
दंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमच कोविड तपासणी केंद्र सुरू करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले. या प्रसंगी रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील उपस्थित होते.
रोटरी क्लब बेळगावतर्फे बॉक्साईट रोडवरील मराठा मंडळ दंत वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकाऱयांनी मराठा मंडळ व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱयांसमवेत चर्चा केली. या केंद्राला आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य रोटरी क्लबतर्फे देण्यात आले आहे. यावेळी बोलताना रो. शरद पै यांनी या प्रकल्पाची गरज स्पष्ट करून लोकांना लवकरात लवकर तपासणी करून मिळणार आहे, असे स्पष्ट केले. सर्व देणगीदारांच्या सहकार्यामुळे हे केंद्र सुरू झाल्याचे सांगून डॉ. उत्कर्षा पाटील व मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी देणगीदारांचा सत्कार केला.
डॉ. शशिकांत कुलगोड यांनी कोविडबद्दल सद्य परिस्थिती स्पष्ट करून कोरोना पुन्हा हळूहळू आपले डोके वर काढत आहे. त्यामुळे हे केंद्र योग्यवेळी सुरू झाल्याचे सांगून लेकव्हय़ू हॉस्पिटल गोवावेस येथे तसेच घरोघरी जाऊन स्वॅब संकलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी मराठा मंडळाचे डॉ. किशोर भट, डॉ. प्रकाश दिवाण यांनी आपले विचार व्यक्त केले. रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील यांनी रोटरीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविले असून या केंद्राचा जनतेला लाभ होईल, असे सांगितले. राजश्री नागराजू यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. आसावरी संत व डॉ. शिल्पा कोडकणी यांनी केले.