राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने सोमवारी रात्री मराठा विकास प्राधिकरण स्थापनेचा अधिकृत आदेश जारी केला आहे. कन्नड संघटनांनी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध व्यक्त करत 5 डिसेंबर रोजी ‘कर्नाटक बंद’ची घोषणा केली तरी सरकारने या इशाऱयाची कोणतीही दखल घेतलेली नाही.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी मराठा समाजासाठी विशेष निगमची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली होती. या निगमसाठी सुरुवातीच्या टप्प्यात 50 कोटी रुपयांची तरतूद करत असल्याचे सांगितले होते. मागील आठवडय़ात मंत्रिमंडळ बैठकीतही मराठा विकास निगम स्थापनेला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला विरोध करत काही कन्नड संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तरीही सरकारने निर्णयातून माघार न घेता सोमवारी मराठा विकास निगम स्थापनेचा आधिकृत आदेश दिला आहे.
यानुसार राज्यातील मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासाठी विशेष योजना जारी होणार आहेत. अर्थसंकल्पातही विशेष निधी राखून ठेवण्यात येणार आहे.