महसूलमंत्री आर. अशोक यांची ग्वाही : मराठा समाजाचे देशावर मोठे ऋण : समाजाच्या विकासासाठी त्वरित शंभर कोटी मंजूर करा
प्रतिनिधी / बेळगाव
मराठा विकास निगमवर अध्यक्ष व पदाधिकाऱयांची नियुक्ती वेगवेगळय़ा निवडणुकांमुळे लांबली होती. लवकरच या नियुक्त्या करण्यात येतील. याबरोबरच निगमला आवश्यक अनुदानही देण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री आर. अशोक यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. या मुद्दय़ावर विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सरकारचे लक्ष
वेधले होते.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर मराठा विकास निगमवरून बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सरकारला खडसावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आज आम्ही सारे हिंदू म्हणून जगतो आहोत. त्यांच्यामुळे हिंदू धर्म टिकला. मराठा समाजाचे देशावर मोठे ऋण आहेत. हे ऋण फेडण्यासाठी सरकारने त्वरित मराठा विकास निगमवर पदाधिकाऱयांची नियुक्ती करावी व समाजाच्या विकासासाठी त्वरित शंभर कोटी रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी केली.
औरंगजेबाचा जयजयकार करणाऱयांना 200 कोटीचा निधी दिला जातो. मराठा समाज हा पराक्रमी समाज आहे. या समाजाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी मराठा विकास निगमची घोषणा करून 50 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. अद्याप अध्यक्ष व इतर सदस्यांची नियुक्ती झाली नाही. 50 कोटीचा निधी कुठे पुरणार आहे? त्यामुळे सुरुवातीला किमान 100 कोटी रुपये द्या, अशी मागणीही बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केली.
मराठा समाजाचा विकास झालाच पाहिजे
केवळ घोषणा करून चालणार नाही. मराठी आणि मराठा या दोन्ही गोष्टी वेगळय़ा आहेत. मराठा समाज आहे. मराठी ही भाषा आहे. मराठा समाजाचा विकास झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षण केले. त्यांचे ऋण फेडण्यासाठी याच अधिवेशनात निधीची घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर उत्तर देताना महसूलमंत्री आर. अशोक यांनी सरकार मराठा समाजाच्या विकासाला प्राधान्य देते. निवडणूक आचारसंहितेमुळे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती झाली नाही. लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे जाहीर केले. ही चर्चा सुरू असतानाच मराठा आणि मराठी यावर गदारोळ सुरू झाला. चर्चेत भाग घेत सभाध्यक्ष कागेरी यांनी लवकरात लवकर यासंबंधी निर्णय घ्या, असा सल्ला सरकारला दिला.