ऑनलाईन टीम
राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून वाद सुरू आहे. आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट करत, “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असं आवाहन केले आहे. सारथी संस्थेसंदर्भात छत्रपती संभाजीराजे सातत्यानं आवाज उठवत असून सारथीचा कारभार सुरुळीत करावा, अशी मागणी करत आहेत.
गेल्या काही काळापासून सारथी संस्थेच्या कामात गोंधळ सुरू असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानेही आक्रमक भूमिका घेत मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर वडेट्टीवार यांनी ओबीसी असल्याने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विट करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं आवाहन केलं आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय.
काय म्हणाले मंत्री वडेट्टीवार
“सारथीसाठी मी प्रामाणिकपणे काम करतोय. परंतु, मी ओबीसी समाजातून आलेलो आहे त्यामुळे सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, असं मला वाटतंय. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे,” असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.