मुंबई \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधाऱ्यांच्या या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं असल्याचं देखील ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात नवाब मलिक यांना का पुढे करण्यात आलं? राष्ट्रवादी काँग्रेसकडे एवढे नेते असताना नवाब मलिकच का? तसेच नवाब मलिक मराठा आरक्षणावर बोलतात मग मुस्लिम आरक्षणावर का बोलले नाहीत? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारलंय. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे आता मराठा आरक्षणावर फुलस्टॉप लागल्याचंही आंबेडकर म्हणाले. आता गरीब मराठ्यांनी आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे, असंही देखील ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं आहे. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांमध्ये बसणारे आरक्षण राज्य सरकारनं आणायला हवं. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठा समाजाला जगू देणार नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा नेत्यांनी गरीब मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आले.
‘