मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे यांचे सूचक ट्विट : राजकीय वर्तुळात चर्चेला उधान, भूमिकेबद्दल उत्सुकता
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात आरोप-प्रत्योरोप सुरू असताना आता बैठकाही सुरू झाल्या आहेत. त्यातच आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजात खदखद निर्माण झाली आहे. या साऱया वातावरणात मंगळवारी खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नाबाबत आपण भूमिका जाहीर करणार असल्याचे सूचक ट्व्टि केले आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे राज्यातील समस्त मराठा समाजासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी मंगळवारी ट्व्टि केल्यानंतर राज्यातील चर्चेला प्रारंभ केला. लवकरच आपण मराठा आरक्षणप्रश्नाबाबत भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर संभाजीराजे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाच्या लढÎात गेल्या काही वर्षात संभाजीराजे यांचे नेतृत्व पुढे आले आहे. त्यांनी आरक्षणाच्या आग्रही मागणीबरोबर मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना या संदर्भात सवलती मिळाव्यात यासाठीही सातत्याने राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा केला आहे.
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशा वातावरणात राज्यात सत्तेवर असणारे महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामध्ये कुणीही आरक्षण मिळण्यासाठी मार्ग काढण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत काय बोलतात़ ? याकडे लक्ष लागले आहे.