ओरोस / प्रतिनिधी-
मराठीतील ज्येष्ठ कवी, संपादक, सावंतवाडी येथे झालेल्याअण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सतीश काळसेकर यांचे पेण येथील राहत्या घरी काल रात्री दुःखद निधन झाले. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे येथील होते.
साठच्या दशकातील लघु अनियतकालिकांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यानी अनेक नियतकालिकांची निर्मिती व संपादन केले. मानवी नात्यातील गुंतागुंत व समकाळ यांसारख्या आशयसूत्रांच्या अनुषंगाने त्यानी कवितालेखन केले. काळसेकरांचा ग्रंथ संग्रह अफाट आहे. पेण येथील घर त्यांनी पुस्तकांसाठीच बांधले आहे. पन्नास हजाराहून अधिक पुस्तकं या त्यांच्या संग्रहात आहेत. वाचकाची रोजनिशी या पुस्तकात त्यानी आपण वाचलेल्या अनेक पुस्तकांच्या वैशिष्टय़पूर्ण नोंदी केल्या आहेत. मराठीतील दुर्मीळ म्हणता येईल अशा झपाटलेल्या वाचकांपैकी ते एक होते.