कवी इंद्रजीत भालेराव व गोविंद पाटील यांनी केले कवितांचे सादरीकरण
प्रतिनिधी / कोल्हापूर
‘शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो, कष्टतो, माझा शेतकरी बाप…’, ‘गावाकडं चल माझ्या दोस्ता…’ आणि ‘मी कवितेपायी जळाया आलो, जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो…’ अशा कवितांच्या सादरीकरणामध्ये विद्यापीठातील काव्यरसिक शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी चिंब झाले होते.
ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव आणि गोविंद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिना निमित्त आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात त्यांनी कविता सादरीकरण केले. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि मराठी अधिविभागाच्या सहकार्याने ग्रंथालयामोरील उद्यानात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी ‘कबीर’ ही आपली दीर्घकविता सादर करून कार्यक्रमास प्रारंभ केला. ‘देवाशिवाय धर्म, धर्माशिवाय आध्यात्म, म्हणजे तुझी कविता, कसे अंकुरतील कोंब कवितेचे? शेवटी कविता ही आध्यात्मच असतं ना, म्हणून फकिरीतच रमतात खरे कवी…’ अशा कविता सादरीकरणाने उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर कवी भालेराव यांनी विद्यार्थ्यांत लोकप्रिय असणाऱया ‘बाप’ आणि ‘गावाकडं चल…’ या दोन कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. कवी गोविंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण काव्य सादरीकरणाने रसिक नादावले. कवीवर्य सुरेश भट यांच्या ‘लाभले अम्हास भाग्य…’ हे उपस्थितांना सामूहिकरित्या म्हणावयास लावून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाची उत्तम वातावरणनिर्मिती केली. ‘कर्जात जन्मलो आम्ही…’ आणि ‘माझा बाप…’ ही कविताही सादर केल्या.
‘तुझ्यासारखीने बघावे कशाला, सुचेना जगावे कसे आरशाला’ ही प्रेमकविता आणि एक विडंबनकाव्यही सादर केले. कवीवर्य शंकर वैद्य यांच्या ‘वाळवंटातून भीषण चालले जीवन’ ही कविता सादर करून त्यांनी या काव्यमैफिलीचा समारोप केला. अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. आलोक जत्राटकर, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, रविंद्र जोशी, धनाजी घोरपडे, सुजाता चोपडे, संध्या पाटील, कवी मंदार पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.