अभिनेते सुबोध भावेंची अपेक्षा : ‘लोकमान्य’ प्रस्तुत ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ 11 एप्रिलपासून बिग एफएमवर
प्रतिनिधी /पुणे
मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. पण, तिथपर्यंत न थांबता मराठी चित्रपटांपुढे ‘लोकमान्यते’चे बिरुद लागले पाहिजे, असे मत अभिनेते सुबोध भावे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
मराठी श्रोत्यांसाठी यापूर्वीच्या यशस्वी शोच्या संकल्पनेवर आधारित ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ प्रस्तुत ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ हा शो बिग एफएमवर सादर होणार आहे. हा शो पुण्यात सोमवार ते शनिवारी सायंकाळी सात ते आठ यावेळेत 95 बिग एफएमवर, तर उर्वरित महाराष्ट्रात 92.7 बिग एफएमवर प्रसारित होणार आहे. याशिवाय मुंबईत दर रविवारी पाच ते सहा वाजता, तर गोव्यात दर रविवारी सात ते आठ यावेळेत हा शो ऐकता येईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर, ‘लोकमान्य’चे क्षेत्रिय व्यवस्थापक सुशील जाधव, इझी ड्रायचे निलेश राठी, बी. यू. भंडारीच्या वैजयंती शेवडे, कॅफे दुर्गाचे कपिल कुलकर्णी उपस्थित होते.
सुबोध भावे म्हणाले, मराठी चित्रपटांना राजमान्यता आहेच. पण त्यांच्यापुढे ‘लोकमान्यते’चे बिरुद लागले पाहिजे. मराठी चित्रटातील घटक भाषा, कलाकृतीबद्दल एक प्रकारची कमीपणाची भावना आहे. मराठी समाज माध्यमांमध्येही तसेच आहे. मराठी कलाकार हिंदीत कधी काम करणार आणि हिंदी कलाकार मराठी चित्रपटांमध्ये कधी काम करणार? असे प्रश्न विचारून कलाकारांमध्ये कॉम्प्लेक्स निर्माण केला जातो. मराठी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांनी काम केले तर प्रॉब्लेम काय आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. माझ्या भाषेत आधीच्या कलाकारांनी मोठे योगदान दिले आहे. दादासाहेब फाळके होते म्हणून भारतातील चित्रपटसृष्टी आहे. बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर यांनी जी बीजे रोवली, त्या बीजावरती हा वृक्ष उभा आहे, अशी भावनाही सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
…तेव्हा पुष्पापेक्षाही दर्जेदार मराठीत बनतील
दक्षिणेकडील चित्रपटांची आज पेक्षकांना भुरळ पडली आहे. म्हणजेच दक्षिणेकडील चित्रपट हे बॉलिवूडच्या पुढे आहेत. तांत्रिकदृष्टय़ा तिकडचे चित्रपट सरस असतीलही. पण, तिथले प्रेक्षकही त्या चित्रपटांना उचलून धरतात. तिथे तेलगू, तमिळ, कन्नड चित्रपट उतरवून बॉलिवूडचे चित्रपट लावले जात नाहीत. तसे मराठीत घडत नाही. मराठी पेक्षकही बोलायला लागतील, तेव्हा पुष्पापेक्षाही दर्जेदार चित्रपट मराठीत बनतील, असे त्यांनी सांगितले.
माझ्यावर ‘श्यामची आई’ चित्रपटाचे संस्कार
माझ्यावर गनिमी कावा, श्यामची आई या दोन चित्रपटांचे संस्कार आहेत. त्यानंतर मी वेगवेगळे चित्रपट पहायला लागलो, असेही भावे यांनी नमूद केले.
लोकमान्यचा अजून विस्तार करायचा आहे – किरण ठाकुर
किरण ठाकुर म्हणाले, ‘लोकमान्य’च्या शाखा चार राज्यांमध्ये आहेत. अजून वेगवेगळय़ा राज्यांमधून ‘लोकमान्य’चा विस्तार करायचा आहे. लोकमान्यांच्या वास्तूमध्येच ‘लोकमान्य’ची शंभरावी शाखा आहे, याचा अत्यंत आनंद आहे.