हिंडाल्को कंपनीकडून पाच लाख रुपयांचा धनादेश बांधकाम कमिटीकडे सुपूर्द : कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांतून समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील मराठी प्राथमिक शाळेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून शुक्रवारी हिंडाल्को कंपनीकडून पाच लाख रुपयांचा धनादेश बांधकाम कमिटीकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे पालकवर्ग व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील होते. व्यासपीठावर हिंडाल्कोचे अधिकारी विश्वास शिंदे, सचिन, गडकरी, रवि विसगुप्पी, ग्रा. पं. अध्यक्षा संध्या चौगुले, उपाध्यक्ष अनिल पावशे, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन भैरटकर, उपाध्यक्षा रंजना हुदली उपस्थित होत्या.
माजी विद्यार्थी संघटना, ग्रामस्थ व इतर देणगीदारांच्या सहकार्यातून मराठी प्राथमिक शाळेचे बांधकाम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात
आले.
सहशिक्षक पी. ए. पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये शासन, माजी विद्यार्थी संघटना व ग्रामस्थांनी मराठी शाळेची नूतन इमारत उभारणीचे काम हाती घेऊन बांधकाम सुरू केल्याबद्दल सर्वांचे स्वागत करून आभार मानले. अध्यक्षा संध्या चौगुले व इतर सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य यल्लोजी पाटील, शाळा सुधारणा अध्यक्ष मोहन भैरटकर आदींच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. ग्रा. पं. जयराम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. हिंडाल्कोचे अधिकारी व इतर उपस्थित मान्यवरांचे शाळा सुधारणा कमिटी व माजी विद्यार्थी संघटनेच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हिंडाल्कोकडून यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन
हिंडाल्कोकडून आयोजित देणगी सुपूर्द कार्यक्रमामध्ये हिंडाल्कोचे अधिकारी विश्वास शिंदे यांनी बांधकाम कमिटी सदस्य व ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील यांच्याकडे शाळेच्या बांधकामासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ते म्हणाले, मराठी संस्कृती टिकविण्यासाठी अशी ज्ञानमंदिराची जोपासना ठेवणे, तुम्हा आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. मराठी शाळेला आम्ही कंपनीच्या माध्यमांतून परत मदत करू, असे आश्वासन दिल्यावर उपस्थितांकडून टाळय़ांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला बांधकाम कमिटी सदस्यांसह शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक यु. पी. चौगुले यांनी केले. सहशिक्षक आय. जी. तारोडकर यांनी आभार मानले.
देणगी जमा करण्याचे आवाहन
मराठी प्राथमिक शाळा बांधणे, याबद्दल जागृती करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण गावभर गल्लोगल्ली जागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील माजी विद्यार्थ्यांनी बांधकामासाठी देणग्यांचा वर्षाव केला होता. आता प्रत्यक्षात नूतन शाळा बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. नुसतेच शासनाच्या मदतीवर शाळेचे काम पूर्ण होणे अशक्मय असल्यामुळे माजी विद्यार्थी व इतर देणगीदारांचे सहकार्यसुद्धा फार मोलाचे आहे. आम्ही या शाळेतून शिकून आमच्या पायावर उभे राहिलो आहोत, शाळेचे ऋण फेडण्यासाठी व मराठी भाषा संस्कृती अबाधीत राखण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून हे करणे शक्मय आहे. ही आस धरून सर्व माजी विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी देणगीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.