सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, गोखले, सिंग हे पिफ ऍवॉर्डने सन्मानित
पुणे / प्रतिनिधी :
मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबध्द असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आलेल्या सूचना शासनाकडून स्वीकारल्या जातील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी या वेळी विक्रम गोखले, बी.पी. सिंग ‘पिफ डिस्टिंग्विश्ड ऍवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक ऍण्ड साउंड’ प्रदान करून सन्मान करण्यात आला. खन्ना या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे फिल्म फाऊंडेशचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिग्दर्शक बी.पी. सिंग, अभिनेते सुबोध भावे, मोहन आगाशे, शिवाजी साटम, अभिजीत श्रीवास्तव, अभिनेत्री मुक्ता बर्वे, पुणे फिल्म फाऊंडेशचे सचिव रवी गुप्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प संचालक नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जोपासण्याचे मोठे कार्य या माध्यमातून होत आहे. मराठी चित्रपटाच्या महोत्सवाचे परीक्षण करण्यासाठी विदेशातून परीक्षक या महोत्सवामध्ये सहभागी झाले ही गौरवास्पद बाब आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून येणाऱया सर्व संकल्पांना गती देण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
हे सरकार पाच वर्षे टिकेल
कला, संस्कृती, नाटय़ संगीत यांची जोपासना करण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात शासन कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि सांस्कृतिक खात्याकडून विविध प्रश्नांना गती देण्याचे काम नक्कीच केले जाईल, अशी ग्वाही देत राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी देत हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल. याबद्दल कुणीही मनात शंका आणू नये, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
पुढे ते म्हणाले की, ’महाराष्ट्रात निवडणूका झाल्या आणि निवडणुकीनंतर बरेच काही घडले. माझ्या आयुष्यात असा योग इतक्मया लवकर येईल असे वाटले नव्हते; पण एक सांस्कृतिक मंत्री या नात्याने माझ्याकडून ज्या काही अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राची कला-संस्कृती जोपासण्याबरोबरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातही शासन कटीबद्ध आहे. मराठीच्या अभिजाततेबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करू. तसेच, इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहेच. त्याची अंमलबजावणी देखील लवकरच केली जाईल. तसेच, महोत्सवामधून ज्या काही सूचना आम्हाला येतील त्या खुल्या मनाने स्वीकारू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
हा पुरस्कार माझ्यासाठी भावनिकदृष्टय़ा खासः विक्रम गोखले
मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले परंतु डॉ. श्रीराम लागू यांना समर्पित केलेल्या ‘पिफ’ चित्रपट महोत्सवात आज मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी भावनिकदृष्टय़ा खास आहे. डॉ. लागू यांच्याशी माझे फार जवळच्या मैत्रीचे नाते होते. मी 40 वर्षे त्यांचा अभिनय पाहिला आणि त्याचा अभ्यास करत आलो. या अद्वितीय अभिनेत्याचा मृत्यू मला माझे वैयक्तिक नुकसान वाटते, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.