अल्पसंख्याक आयोगाची मनपा आयुक्तांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मातृभाषेत माहिती देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित येणारे नामफलक, दिशादर्शक फलक व माहिती कन्नड भाषेसह मराठीतून द्यावी, अशा सूचना चेन्नई येथील अल्पसंख्याक आयोगाकडून बेळगावच्या मनपा आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका तसेच शहरातील इतर ठिकाणी असलेले मराठी फलक काढून त्या ठिकाणी कन्नड फलक लावण्यात येत आहेत. या विरोधात युवा म. ए. समितीने आवाज उठवून मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व भाषिक अल्पसंख्याक आयोगाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन चेन्नई येथील अल्पसंख्याक आयोगाच्या सहआयुक्तांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून फलकांबाबत सूचना केल्या आहेत.
बेळगाव शहरात मराठी भाषिक नागरिकांची संख्या अधिक असल्याने त्यांना त्यांच्या मातृभाषेतून माहिती देणे आवश्यक आहे. कन्नडसह मराठीमध्येही माहिती फलक, नामफलक असणे आवश्यक आहे.
उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने 18 नोव्हेंबर 2013 मध्ये दिलेल्या निकालानुसार मराठी भाषिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांना सर्व कागदपत्रे व भाषिक अधिकार द्यावेत, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे बेळगावमध्ये मराठी भाषेत माहिती द्यावी, अशी सूचना अल्पसंख्याक आयोगाचे सहआयुक्त एस. शिवकुमार यांनी महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.