विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवर पाठय़क्रम अभ्यासावयास मिळणार : मराठी विद्यानिकेतनमध्ये चित्रीकरणाला प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारच्यावतीने मराठी माध्यमाच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रमाचे चित्रीकरण मराठी विद्यानिकेतन येथे सुरू करण्यात आले आहे. सरकारने उचललेले पाऊल विद्यार्थ्यांच्यादृष्टीने हितावह ठरणार आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारच्यावतीने कन्नड, इंग्रजी, उर्दू माध्यमासाठी चंदन वाहिनीवरून अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्यात आले. पण मराठी माध्यम दुर्लक्षित राहिले होते. अखेर पाठपुरव्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून चंदन वाहिनीवर मराठी अभ्यासक्रम घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या आणि शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर यांच्या सहकार्याने वारंवार सरकार दरबारी हा प्रश्न मांडण्यात आला. सरकारकडून चालढकल होत राहिली. मात्र संघाने प्रयत्न न थांबविता दै. तरुण भारतच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोरोनाचा विचार न करता शिक्षकांनी एकसंघ राहून दहावीसाठी पूर्ण विषयाचे चित्रीकरण करून एक आदर्श निर्माण केला. अखेर याला यश मिळाले असून विद्यार्थ्यांना चंदन वाहिनीवर पाठय़क्रम अभ्यासावयास मिळणार आहे. त्यानुसार लागोपाठ बैठका घेऊन 6 वी ते 10 वीच्या अभ्यासक्रमाच्या चित्रीकरणाचे कार्य सुरू करण्याचे ठरले. त्यामध्ये इ. 8 वी ते 10 वी साठी 8 फेब्रुवारी पासून मराठी विद्यानिकेतन येथे चित्रीकरणाला सुरुवात झाली. सरकारी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य राजू नाईक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एम. सिंधूर, समन्वयक अधिकारी सावकार, वरिष्ठ अधिकारी नागराज काळे, प्रा. झेड. जी. सय्यद, प्रा. ए. बी. अडकी, प्रा. एस. एम. कोटगी, प्रा. व्ही. एल. बेनकट्टी, भारती दासोग, प्रा. बी. एम. नलतवाड यांच्या मार्गदर्शनातून कार्याला सुरुवात झाली.
तसेच कर्नाटक राज्य माध्यमिक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, तंत्रस्नेही रणजित चौगुले, विश्वजीत हसबे, सुरेश भातकांडे, सी. वाय. पाटील, युवराज पाटील, अश्विनकुमार पाटील, शिवाजी जाधव, इंद्रजित मोरे, गजानन सावंत यांच्या सह बेळगाव जिल्हय़ातील तसेच चिकोडी जिल्हय़ातील शिक्षकांच्या सहकार्याने कार्य पूर्णत्वास जात आहे.