निवडणूक न लढविण्याचा निर्णय, माजी महापौर सरिता पाटील यांची भूमिका
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. महापालिकेत मराठी भाषिकांचे वर्चस्व राखण्यासाठी एकीची नितांत गरज आहे. एका वॉर्डात एक मराठी भाषिक उमेदवार दिल्यास महापालिकेत 40 हून अधिक मराठी भाषिक नगरसेवक निवडून आणू शकतो. याचाच एक भाग म्हणून नव्या चेहऱयांना प्राधान्य देण्यासाठी यावेळची निवडणूक लढविणार नसरल्याची भूमिका माजी महापौर सरिता पाटील यांनी स्पष्ट केली.
यापूर्वी महापौर म्हणून अनेक विकासकामांना प्राधान्य दिले तसेच यापुढेही समाजकार्य सुरूच ठेवणार आहे. त्याप्रमाणेच मराठी भाषिकांचे वर्चस्व महापालिकेत राहणे गरजेचे आहे. त्याकरिता म. ए. समिती उमेदवारच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 2007 च्या निवडणुकीवेळी माझ्या सासू लताताई पाटील यांना निवडून देण्यात आले होते. पण त्यांच्या मृत्यु नंतर पोटनिवडणुकीत मला संधी देण्यात आली. तसेच मनपा बरखास्तीनंतर मला पुन्हा संधी देवून बिनविरोध निवडून देण्यात आले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून समाजकार्य करण्याची संधी लाभली. पण महापालिका सभागृहाचा कार्यकालावधी संपल्यानंतरही सामाजिक कार्य सुरूच ठेवले आहे. तसेच आतापर्यतच्या कालावधीत महापौरपद भूषविण्याची संधी मिळाल्याने वॉर्डासह संपूर्ण शहराचा विकास करण्याची संधी मिळाली. स्मार्टसिटीच्या कामाला प्राधान्य दिले. त्यामुळे नागरिकांशी जवळचे नाते आहे. यापुढेही असेच नाते कायम राहिल. यापूर्वी वॉर्डाचे आरक्षण महिलेकरिता राखीव असल्याने मला संधी लाभली. पण यावेळी सामान्यसाठी आरक्षण असून अन्य नागरिक इच्छूक आहेत. यापूर्वी मला सहकार्य केलेल्या इच्छुकांचा समावेश आहे. त्यामुळे नव्या चेहऱयांना संधी देण्याच्यादृष्टीने तसेच म. ए. समितीच्या एकीसाठी आणि विजयासाठी एक पाऊल पुढे टाकत महापालिका निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी जास्त उमेदवार आहेत, त्याठिकाणी एकीसाठी प्रयत्न करून महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी राहण्याची भूमिका माजी महापौर सरिता पाटील यांनी स्पष्ट केली.