काही माजी नगरसेवकांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डस्तरीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी चालविली होती. असंख्य इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले असून निवडणुकीसाठी भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांच्या एकीसाठी आणि मनपात मराठी भाषिकांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काही माजी नगरसेवकांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्ड क्र. 15 मधील मराठी भाषिक उमदेवारासाठी माजी नगरसेवक दिनेश रावळ यांनी निवडणुकीतून माघार घेतले.
बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता कायम आहे. मात्र महापालिकेतील सत्तेपासून मराठी भाषिकांना लांब ठेवण्यासाठी वॉर्ड पुनर्रचना करून नवी खेळी खेळण्यात आली आहे. पण एका प्रभागासाठी एक मराठी भाषिक उमेदवार दिल्यास महापालिकेवरील मराठी भाषिकांची सत्ता अबाधित राहू शकते. यादृष्टीने विविध संघटना, माजी नगरसेवक आणि गल्लीतील पंचमंडळींनी प्रयत्न चालविले आहेत. वॉर्ड पुनर्रचनेचा दगा-फटका मराठी भाषिकांना होऊ शकतो. पण नवख्या आणि निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी भाऊगर्दी होत आहे. प्रत्येक गल्लीतून अनेक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी चालविली आहे. पण मराठी भाषिकांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एकी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने वॉर्ड क्र. 4 मध्ये इच्छुक व नव्या चेहऱयांना प्राधान्य देण्यासाठी माजी महापौर सरिता पाटील यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांनीही मराठी भाषिकांच्या एकीसाठी निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्ड क्र. 15 मधून चार मराठी भाषिक उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच हा वॉर्ड सामान्यांसाठी खुला असल्याने गल्लीतील पंचांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक दिनेश रावळ यांनी देखील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मराठी भाषिक उमेदवाराच्या पाठीशी थांबून विजयी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनी तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. माजी नगरसेवकांचा निर्णय स्वागतार्ह असून मराठी भाषिकांच्या ऐक्मयासाठी आणि मनपावरील विजयासाठी मराठी भाषिकांनी एकच उमेदवार देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.