इचलकरंजीतील नामचीन आकाश वासुदेव गँग अटकेत
पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनींची कारवाई
इचलकरंजी परिसरात गँगवॉर भडकण्याची शक्यता
राजेंद्र होळकर / इचलकरंजी
शहरातील स्टेशन रोडवरील इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटच्या पेट्रोल पंपानजीक दीपक कोळेकर (वय २८, रा. कोरोची, ता. हातकणंगले) या युवकाचा गतवर्षी १० डिसेंबर २०१९ रोजी पूर्ववैमस्यातून खून झाला होता. या खूनप्रकरणी अटक केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेवसह त्याच्या गँगने या खुनाच्या घटनेला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने ‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादाची तयारी सुरु’ अशा आशयाचा व्हिडिओ मोबाईलवर स्टेटस् म्हणून ठेवला होता. याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांना समजताच त्यांनी वासुदेवसह त्याच्या टोळीच्या मंगळवारी पहाटेच्यासुमारास मुसक्या आवळला. पोलिसांनी दीपक कोळेकर खूनप्रकरणी गुन्हेगार आकाश संजय वासुदेव, साथीदार अक्षय सावंत नरळे, मेहबूब इस्माईल उकली, आदिनाथ अनिल बावणे, सुनिल आनंद वागवे, कासीम अब्दुल नदाफ, सागर आंबले (सर्व रा. भोनेमाळ, इचलकरंजी) यांना अटक केली होती. ही गँग कळंबा कारागृहाची काही महिन्यांची हवा खाऊन सध्या जामीनावर बाहेर आली आहे. या गँगने कारागृहातून बाहेर येताच पुन्हा गुन्हेगारी कारनामे सुरुच ठेवले आहेत.
गुन्हेगार वासुदेव याच्यावर १३ नोव्हेंबर २०२० रोजी शहरातील जवाहरनगरामधील विघ्नहर्ता गणेश मंदिरालगत वर्चस्व वादातून इचलकरंजीमधील नामचीन जर्मनी गँगचा म्होरक्या अभिजीत तेरणे आणि साथीदारांनी वर्चस्व वादातून खूनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. तरीदेखील वासुदेव गँगने गुन्हेगारी कारनामे सुरुच ठेवले असून या गँगवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. दरम्यान, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांना कोरोची (ता. हातकणंगले) दीपक कोळेकर याच्या खुनाच्या वर्षपूर्ती निमित्ताने गुन्हेगार वासुदेवसह त्याच्या गँगने ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादाची तयारी’ मिळाली. त्यावरुन पोलीस उपाधीक्षक महामुनी आणि पथकाने या गँगचा सोमवारी रात्री शोध सुरु केला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हेगार वासुदेवसह त्याच्या गँगच्या मुसक्या आवळल्या. या स्टेटसमुळे भविष्यात इचलकरंजी आणि परिसरात गँगवॉर भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.