वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मर्सिडिझ बेंझची भारतातील 2020 सालातील वाहन विक्री 43 टक्के घटली आहे. असं जरी असलं तरी यंदा मात्र मर्सिडिझने भारतासाठी दमदार प्लॅन तयार केला आहे. 2021 मध्ये कंपनी नव्या 15 कार्स भारतीय रस्त्यावर उतरवणार आहे.
कोरोनाच्या कारणास्तव कंपनीला आपला व्यवसाय काहीसा बंद करावा लागला होता. पण तरीही असे असताना कंपनीने भारतात लक्झरी कार गटात आघाडीवरचे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. 2020 मध्ये कंपनीने 7 हजार 893 कार्सची विक्री केली आहे.
2019 मध्ये कंपनीने 13 हजार 786 कार्सची विक्री केली होती. 2020 च्या चौथ्या तिमाहीत विक्रीची परिस्थिती खूप सुधारली आहे. कंपनीच्या कार्स विक्रीने तिसऱया तिमाहीपेक्षा चौथ्या तिमाहीत 40 टक्के वाढ दर्शविली आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 2 हजार 386 कार्स विकता आल्या तर दुसऱया तिमाहित विक्री एकदम घटली. तिसऱया व चौथ्या तिमाहित अनुक्रमे 2 हजार 58, 2 हजार 886 कार्सची विक्री केली.
यंदा 15 कार्स
मागच्या वर्षी मर्सिडिझ बेंझने भारतात निर्मितीला बळ देण्यासाठी 400 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची बाब स्पष्ट केली होती. यंदा कंपनीच्या 15 नव्या कार्स बाजारात उतरताना दिसणार आहेत. यात काही जुन्या गाडय़ांच्या सुधारीत आवृत्याही असतील.