पंतप्रधान मोदी अन् राहुल गांधींकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था/ कोट्टायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील ख्रिश्चन धर्माच्या ऑर्थोडॉक्स समुदायाचे प्रभावी पाद्री बेसेलियस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च ऑफ इंडिया’चे सर्वोच्च प्रमुख बेसेलियस मारथोमा पॉलोस द्वितीय यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. पाद्री निधनासमयी 74 वर्षांचे होते.
बेसेलियस यांनी स्वतःच्या मागे सेवा आणि करुणेचा समृद्ध वारसा सोडला आहे. या दुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना ऑर्थोडॉक्स चर्चच्या सदस्यांसोबत आहेत. त्यांच्या आत्म्याला शाश्वत शांती मिळो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले आहे. कोरोनाची लागण झाल्याने पाद्रींवर पतनमतिट्टा जिल्हय़ातील पारुमाला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
धर्मगुरु असण्यासह बेघरांसाठी मानवतवादी कार्यांसाठी त्यांना आठवणीत ठेवले जाईल असे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही शोक व्यक्त केला आहे. डिसेंबर 2019 मध्ये बेसेलियस यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.