प्रतिनिधी/शाहुवाडी
शाहुवाडी तालुक्यातील कंटेन्मेंन्ट झोन उठला असला तरी लॉकडाऊनच्या नियमास बांधील राहुनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मलकापूर शहरातील बाजापेठ सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. नगर परिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या नऊ ते चार या वेळेत सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच दुकाने सुरू राहतील अशी सूचना तहसीलदार बिराजदार यांनी मलकापूर नगर परीषदेत व्यापारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिली.
तर पोलिस प्रशासनाच्यावतीन ही लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी दिला. उचत पैकी लहीन गल्ली येथे तीन कोरोना रुग्ण सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेला कंटेन्मेंन्ट झोन उठविल्यानंतर मलकापूर शहरातील व्यापारी यांची नगर परिषदेत आयोजित बैठक प्रसंगी ते बोलत होते.
शहरातील दुकाने चालू करण्यासंबंधात लॉकडाऊन नियमांचं कोणीही उल्लंघन करू नये. सोशल डिस्टन्सिंग पाळूनच व्यवसाय सुरू करावा याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी व्यापारी वर्गाला सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, मुख्याधिकारी शीला पाटील, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, नगरसेवक प्रवीण प्रभावळकर, दिलीप पाटील, सुहास पाटील, बाबासाहेब पाटील, रमेश चांदणे, माया पाटील, भारत गांधी, मानसिंग कांबळे आदींच्या सहा पालिकेचे अधिकारी शहरातील सर्व विक्रेते उपस्थित होते.