कराड / प्रतिनिधी:
मलकापूर ता. कराड येथील लोटस फर्निचर या दुकानाला गुरूवारी दुपारी भीषण आग लागली. दुकानाच्या पाठीमागील बाजूने आग वाढत पुढच्या भागापर्यंत आली. या आगीत दुकानातील लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले.
भरदुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. या आगीच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. अचानक लागलेल्या आगीमुळे लोटस फर्निचर दुकानाचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील रहिवाशांमधेही भितीचे वातावरण पसरले होते. महामार्गावरील बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा येत होता. पोलिसांनी किरकोळ लाठीमार करत जमावाला पांगवले.