महिलांसाठी सिंधुताई सपकाळ आरोग्य योजना जाहीर
प्रतिनिधी/ कराड
मलकापूर नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय विशेष सभा मंगळवारी पार पडली. नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत शहरातील महिलांसाठी ज्येष्ठ समाजसेविका स्व. सिंधुताई सपकाळ महिला आरोग्य तपासणी योजनेची घोषणा करण्यात आली. दरम्यान कोणतीही करवाढ नसलेल्या सन 2022-23 सालच्या अंदाजपत्रकामध्ये एकूण महसुली व भांडवली एकूण जमा 69 कोटी 59 लाख 49 हजार 702 रूपये गृहित धरली असून खर्च वजा जाता 7 लाख 75 हजार 999 रूपयांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास सभागृहाने मान्यता दिल्याची माहिती सत्ताधारी गटाचे नेते उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
मलकापूर नगरपरिषदेने लोकसहभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध योजना हाती घेऊन यशस्वीरित्या सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चोवीस तास नळ पाणीपुरवठा योजना, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, राजमाता जिजाऊ सदृढ माता बालक योजना, महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना या योजनांचा समावेश आहे. या योजना सुरू असतानाच अचानक कोविडची साथ आल्याने गेल्या दोन वर्षात कोणत्याही नवीन योजना हाती घेता आल्या नव्हत्या. आता कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नगरपरिषदेने पुन्हा एकदा नागरी आरोग्य योजनांना मंजुरी दिली आहे.
महिला, मुलींसाठी अनेक योजना
पालिकेने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ महिला आरोग्य तपासणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. विशेषतः रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, हिमोग्लोबीन, करण्यात येणार आहे. यासाठी रक्कम पाच लाखांची तरतुद केलेली आहे. त्याचबरोबर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्या वेतन योजनेंतर्गत कोविडमुळे निराधार झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी मदत व्हावी, या हेतूने व मुलींच्या शिक्षणासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.
शेतीसाठी आर्थिक तरतूद
कोविडमुळे अडचणी आलेल्या शेतीच्या सुधारणेसाठी व पशुधन विकासासाठी पाच लाखांची तरतुद करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच नगरपरिषदेने यापुर्वी सुरु केलेल्या विविध योजनांकरीता रक्कम 71 लाखांची तरतुद केलेली आहे. शहरातील आर्थिक दृष्टय़ा दुर्बल नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजनेचा लाभ देण्यासाठी रक्कम 1 कोटी 21 लाखांची तरतुद केलेली आहे. गेली दोन वर्षे सोलर सिटी योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नागरिकांना देण्यात आली नव्हती. सन पुढील आर्थिक वर्षात अपारंपारिक उर्जा विभाग व नगरपरिषदेच्या माध्यमातून सोलर वॉटर हिटर, सौर दिवे तसेच नेट मीटरींग इत्यादीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आजी माजी सैनिक यांना घरपट्टी व इतर सुविधा मिळणेकामी दहा लाखांची तरतुद करण्यात आली आहे.
करवाढ नसलेले अंदाजपत्रक
या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची नव्याने कर वाढ प्रस्तावित केलेली नाही व कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांच्यावर टाकलेला नाही असेही शिंदे यांनी म्हटले आहे. संक्षिप्त अंदाजपत्रक -सुरवातीची शिल्लक 5,75,999, महसुली जमा 36,21,76,286, भांडवली जमा 33,31,97,417,
एकूण जमा 69,59,49,702. महसुली खर्च 31,69,46,383, भांडवली खर्च 3782,27,320, एकूण खर्च 69,51,73,703, अखेरची शिल्लक 7,75,999.