वार्ताहर/ मलिकवाड
जिल्हा पंचायत, समाज कल्याण खाते, तालुका प्रशासन व ग्रामपंचायत मलिकवाडतर्फे विविध सरकारी योजना व कॅनरा बँकेच्यावतीने पथनाटय़ातून आर्थिक जागृती करण्यात आली. धुळगणवाडी येथील रंगदर्शन ग्रामीण विकास संघ, साफल्य समाजसेवा संस्था मलिकवाड यांच्या सहभागाने पथनाटय़ सादर करण्यात आले. ग्रामपंचायत विकास अधिकारी महेशकुमार एस. के. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रा. पं. सचिव मल्लिकार्जुन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. रंगदर्शन संघाच्यावतीने अस्पृश्यता निवारण, मागासवर्गीयांवरील अन्याया विरोधातील, भूसुधारणा कायदा, आंतरजातीय विवाह, खोटे प्रमाणपत्र सादर केल्यास गुन्हा, देवदासी निर्मुलन, विद्यार्थ्यांना शिष्यवेतन याबाबत पथनाटय़ातून जागृती करण्यात आली. चिकोडी येथील कॅनरा बँकेच्या आर्थिक साक्षरता अमुल्य केंद्राच्यावतीने समुपदेशक विजय वाघमारे यांनी नागरिकांना आर्थिक व्यवहार कसे करावेत, एटीएम, कॅशलेस व्यवहार, बँकेच्या विविध कर्ज योजनांबाबत माहिती दिली. सुजाता मगदूम यांनी कोरोनाबाबत जागृती गीत सादर केले. यावेळी चंद्रकांत शिंदे, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते भरत कलाचंद्र, सुप्रिया कलाचंद्र, राजेंद्र कोळी यांच्यासह कलाकार, नागरिक उपस्थित होते.