ऑनलाईन टीम / बुलढाणा :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर आता भाजप आमदार श्वेता महाले यांनीही मलिकांवर गंभीर आरोप करत राळ उडवून दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना श्वेता महाले म्हणाल्या, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस पक्षासोबत सत्तेत बसली तेव्हाच त्यांनी हिंदुत्वाला लाथाडले होते. आता त्यांच्या अंगावर केवळ नावापुरती हिंदुत्वाची झूल आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब ठाकरे लढले आणि मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. आज काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले, त्याच मलिकांना वाचवण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे हिंदुत्त्व हे ढोंगीपणाचे आहे, असाही आरोप महाले यांनी केला. दरम्यान, महाले यांच्या या वक्तव्यांवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.