चौथ्या तिमाहीमधील स्थिती : पीव्हीआरला जानेवारी ते मार्चमध्ये 289 कोटीचा तोटा
वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना महामारीचा फटका देशातील सर्व घटकांना बसत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये चित्रपटगृहांची स्थिती नाजूक होत चालली आहे. कारण या क्षेत्राला पहिल्या लाटेमध्ये लागू करण्यात आलेली बंदी ही आतापर्यंत कायम आहे.
या घडामोडींचा नकारात्मक परिणाम म्हणून मल्टीप्लेक्स कंपनी पीव्हीआरला चौथ्या तिमाहीच्या कामगिरीत 289.1 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आहे. वर्षभराअगोदर समान तिमाहीत 74.5 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. याप्रकारे आयनॉक्स लेजरलाही मार्च तिमाहीत 93.69 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
पीव्हीआरच्या महसूलात घट
कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार पीव्हीआरचा महसूल हा जानेवारी ते मार्च तिमाहीत 263.3 कोटी रुपयांवर राहिला. जो वर्षभराअगोदर 661.78 कोटी रुपयांनी म्हणजे 60 टक्क्यांनी कमी राहिला आहे.
लॉकडाऊनचा परिणाम
पीव्हीआरने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन, सामाजिक अंतर, कमी आत्मविश्वास याचा नकारात्मक परिणाम इंडस्ट्रीवर पडताना दिसतो आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या माहितीनुसार सक्तीच्या बंदीमुळे या उद्योगाचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये या आकडय़ामध्ये 900 कोटी रुपयांचा तोटा झाला.
लसीकरणावर नजर सध्याची नुकसानीची स्थिती बदलण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढल्यास त्याचा फायदा ही अडचणीची स्थिती सामान्य होण्यात होणार असल्याचे पीव्हीआरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय बिज्ली यांनी म्हटले आहे.