वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट आरक्षित करणारा भारतीय मल्ल सुमित मलिक याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने आता तो तीन आठवडय़ांसाठी कुस्ती क्षेत्रामधून अलिप्त राहील.
सुमित मलिकला काही दिवसापूर्वी गुडघ्याला दुखापत झाली होती. ही दुखापत पुन्हा चिघळल्याने सोफियातील विश्व ऑलिंपिक पात्र फेरीच्या स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली. सोफियातील स्पर्धेत शनिवारी 28 वर्षीय सुमित मलिकने 125 किलो वजनगटात अंतिम फेरी गाठली होती. त्याचा अंतिम फेरीतील सामना रशियाच्या कोझीरेव्हशी होणार होता पण मलिकने माघार घेतल्याने कोझीरेव्हला पुढे चाल मिळाली. सुमित मलिकने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे आपले तिकीट निश्चित केले आहे. या दुखापतीमुळे सुमित मलिकला किमान तीन आठवडे सराव करता येणार नाही,.
भारतीय कुस्ती फेडरेशनने सोफियातील स्पर्धेसाठी 12 जणांचा संघ पाठविला होता. त्यामध्ये ग्रीको रोमन पद्धतीच्या विभागात सहा पुरूष मल्लांचा समावेश होता. चार दिवसांच्या या ऑलिंपिक पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या दोन मल्लांनी टोकियो ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले. सुमित मलिक आणि महिला मल्ल सीमा बिस्ला हे आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतील.