वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल सुमित मलिकने दुसऱया चाचणीची तयारी दर्शवली असून ब नमुन्याची तपासणी 29 वा 30 जून रोजी केली जाणार आहे. या चाचणीनंतरच त्याच्या ऑलिम्पिक सहभागाबाबत अंतिम निर्णय होईल.
सध्याच्या स्थितीत सुमित मलिक उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील त्याचा सहभाग धोक्यात आहे. मात्र, ब चाचणीत निर्दोष आढळून आल्यास त्याला ग्रीन सिग्नल मिळू शकेल.
2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुमित मलिकने सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर बल्गेरियातील झालेल्या टोकिओ ऑलिम्पिक पात्र फेरीच्या स्पर्धेत त्याने 125 किलो वजन गटातून टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. मात्र, पहिल्या चाचणीत दोषी आढळून आल्याने त्याच्या ऑलिम्पिक सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.