एक जण पोलिसांच्या ताब्यात तालुक्यात खळबळ
प्रतिनिधी/ नवारस्ता
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ बाजारपेठेत बनावट शंभराच्या नोटांची विक्री करणारा एकाला मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत त्या संशयिताची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या बनावट नोटाची बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याच्या संशयाने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार दि. 30 रोजी तालुक्यातील मल्हारपेठ या गजबलेल्या बाजारपेठेत एक संशयित आपल्या पांढऱया रंगाच्या हिरो होंडा प्लेजर या स्कुटीवरून आला असून त्याने काही दुकाने, पान टपऱयामध्ये साहित्य खरेदी करत असताना त्याच्याकडे असलेल्या संशयास्पद नव्या शंभर रुपयांच्या बंडलमधून नोटा देत असल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाजारपेठेतील काही जागृत दुकानदारांनी तत्काळ पेट्रोलिंगसाठी बाजारपेठेत उपस्थित असलेले मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर पोलिसांनी संशयिताला आणि त्याच्याजवळ सापडलेल्या काही बनावट नोटा तत्काळ ताब्यात घेतल्या असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.
दरम्यान, या घटनेतील संशयित हा उंब्रज येथील असून त्याचे उंब्रज येथे फूट वेअरचे नामांकित दुकान असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. दरम्यान, रात्री उशिरा पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यास भेट देऊन चौकशी केली.
चौकटः बंडल फाडण्याचा प्रयत्न?
मल्हारपेठचा बुधवार हा आठवडा बाजार असतो तर शनिवारी मार्केट बंद असते. मात्र सुदैवाने आज शनिवारी मार्केट बंद असताना हा प्रकार घडला तरीही काही चाणाक्ष व्यापाऱयांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यावेळी संशयिताने आपल्या जवळ असलेला बनावट नोटांचा बंडल फाडण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला.