होळकर सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्वसामान्य मेंढपाळाचा मुलगा ते सुभेदार हा मल्हाराव होळकर यांचा थक्क करणारा प्रवास बहुजन समाजासाठी प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी केले. सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 255 व्या पुण्यतिथीनिमित्त मल्हारसेना व धनगर समाज युवक संघटना यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांच्या हस्ते सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मल्हारराव होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
रानगे पुढे म्हणाले, मराठेशाहीचा झेंडा अटकेपार फडकवणाऱया सुभेदार मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे. तत्कालीन इतिहासकारानी सुभेदार होळकर यांचा इतिहास समाजापुढे आणला नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बहुजन समाजातील तरुणांनी संशोधन करून शूर पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खरा इतिहास समाजापुढे आणावा. असे आवाहन रानगे यांनी केले.
पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक घुले यांनीही मार्गदर्शन केले गोकुळचे नूतन संचालक व मल्हार सेना जिल्हाप्रमुख बयाजी शेळके यांनी आभार मानले. यावेळी धनगर समाज समन्वय समितीचे सह निमंत्रक राजेश बानदार पत्रकार बाळासाहेब कोळेकर, बाबुराव रानगे व मोहन डबाने उपस्थित होते.