वार्ताहर / मळेवाड:
गेल्या चार दिवसांपासून वरची मळेवाड येथील बेपत्ता असलेला युवक सतीश तुकाराम मोरूडकर (29) याचा मृतदेह अखेर मळेवाड नदीपात्रात परबवाडी – राणेवाडीदरम्यान सापडला. मळेवाड-कोंडुरा येथील आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य बापू मुळीक, त्यांचे सहकारी सागर मुळीक, सागर नाईक व पोलीस केरकर यांनी मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. रात्री उशिर झाल्याने शवविच्छेदन रविवारी
मळेवाड आरोग्य केंद्रात केले जाणार आहे.
मंगळवारी सायंकाळपासून सतीश बेपत्ता होता. घरातील तसेच वाडीतील लोकांनी शोधाशोध करूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर पोलीस ठाण्यात सतीश बेपत्ता असल्याची खबर घरच्यांनी दिली होती. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास स्थानिकांना नदीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. लागलीच स्थानिकांनी याची कल्पना पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. घरातील मंडळींनी मृतदेह सतीशचाच असल्याचे सांगितले. सतीश हा अविवाहित होता. तो मोलमजुरीची कामे करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पुतणे, काका असा परिवार आहे.