ऑनलाईन टीम / चंद्रपूर :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड उठली असतानाच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीला परवानगी देणारे हे सरकार बेवडय़ांना समर्पित असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मुनगंटीवार म्हणाले, समाजसुधारकांचा महाराष्ट्र आता समाज बिघडविणाऱ्यांचा हातात गेला आहे. आगोदर लोकांनी निवडून दिलेले सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत होते. शेतकरी, कष्टकरी वंचिताच्या हिताचे निर्णय घेत असते. पण जेव्हा एखादे सरकार बेईमानीच्या आधारावर निवडून येते. जनादेशाचा अवमान करून निवडून येते, अशा सरकारच्या हातून बेवडय़ांची सेवा घडते. हे पुर्णपणे बेवडय़ांना समर्पित सरकार आहे.
सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले नाही पण दारुचा 300 टक्के असणारा कर 150 टक्के केला. यामुळे हे सरकार समाज बिघडवणारे असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.