अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी : सुन्नी वक्फ बोर्डाकडून याचिका
वृत्तसंस्था / प्रयागराज
अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिर परिसरात ज्ञानवामी मशिदीच्या पुरातत्व सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने वाराणसीच्या न्यायालयात याप्रकरणाशी संबंधित सर्व सुनावण्यांनाही स्थगिती दिली आहे. वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने एप्रिल महिन्यात पुरातत्व विभागाला सर्वेक्षणाचा आदेश दिला होता.
दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यावर उच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवला होता. वादग्रस्त भूमीचे सर्वेक्षण भारतीय पुरातत्व विभागाकडून करविण्याच्या आदेशाला मशिदीच्या इंतजामिया कमिटी आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने आव्हान दिले होते.
या वादाशी संबंधित एक प्रकरण पूर्वीच उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा सिथतीत वाराणसीच्या न्यायालयाला अशाप्रकारचा आदेश देण्याचा कुठलाच अधिकार नाही. हा चुकीचा आदेश असून तो रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.