पेशावरच्या जामा मशिदीवर आत्मघाती हल्ला , 200 हून अधिक जण जखमी
पेशावर / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील पेशावरमध्ये शुक्रवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराने नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमलेल्या जमावाला लक्ष्य केले. या घटनेत 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतर शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून संशयितांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या स्फोटामुळे ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्फोटानंतर पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी स्फोट क्षेत्राला वेढा घातला आहे. हा स्फोट घडवणाऱया आत्मघाती हल्लेखोराचे सहकारी जवळपास उपस्थित असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पेशावरचे कॅपिटल सिटी पोलीस अधिकारी (सीसीपीओ) एजाज अहसान यांनी या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी ठार झाल्याचे सांगितले. तसेच एकूण 57 जण ठार झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जखमींपैकी जवळपास 40 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमींमुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे लेडी रीडिंग हॉस्पिटलच्या प्रवक्त्याने सांगितले.
हल्ल्यात दोन आत्मघाती हल्लेखोरांचा हात
प्राथमिक वृत्तानुसार, दोन हल्लेखोरांनी पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार येथील जामा मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्वप्रथम मशिदीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर काही वेळातच मशिदीत मोठा स्फोट झाला.
ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानात पोहोचल्यानंतर हल्ला
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या हल्ल्याच्या काही तास आधी पाकिस्तानात पोहोचला होता. त्याच्या सुरक्षेबाबत आधीच चिंता व्यक्त केली जात होती. आता या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्मयता आहे. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास 10 वर्षे पाकिस्तानमध्ये एकही कसोटी सामना झाला नाही. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही संघाकडून हिसकावून घेण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा दौरा ही पाकिस्तान क्रिकेटसाठी प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे पाकिस्तानची कोंडी होऊ शकते.