काबूल
अफगाणिस्तानातील कुंदुजमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक जणांना आपला प्राण गमवावा लागला असल्याची माहिती तालिबान पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही हल्ल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. अफगाणिस्तानातील उत्तरी प्रांतातील कुंदुजमध्ये शिया समुदायाला लक्ष करून सदरचा स्फोट घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी दुपारी मशिदीत शक्तिशाली स्फोट झाला ज्यात जास्तीत जास्त 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी दुपारी बांधव नमाज पढण्यासाठी येथील सय्यद अबाद मशिदीत एकत्र आले होते. एएफपी न्यूज एजन्सीने इस्पितळाच्या सूत्रामार्फत कमीत कमी 50 जण मृत पावल्याचे स्पष्ट केले आहे. अद्यापपर्यंत तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर याठिकाणी इस्लामिक स्टेटने हल्ले वाढवले आहेत. मागच्या रविवारी काबुलमध्येही मशिदीत स्फोट झाला होता, ज्यात 12 जणांना प्राण गमवावा लागला होता. जर का 100 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली तर अमेरिका व नाटोने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.