प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करून सर्व खात्यांना मशीनद्वारे हजेरी नोंदणी पद्धत चालू करण्याचे आदेश दिले आहेत. सचिवालय तसेच स्वायत्त संस्था, महामंडळे यांनाही त्यांचे कर्मचारी, अधिकारी वर्गाकरीता मशीनद्वारे हजेरीची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यापासून मशीनद्वारे हजेरी नोंद करणे बंद केले होते. त्याऐवजी पुन्हा मस्टर नोंदणीपद्धत सुरू केली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन नियंत्रणात आल्यामुळे सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मशीनातून होणारी हजेरी नोंदणी पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही खात्यांमध्ये मशीनात बोट लावून हजेरी नोंदणी व्हायची तर काही ठिकाणी चेहरा दाखवून हजेरी नोंद करण्यात येत होती. दोन्ही पद्धती त्या त्या ठिकाणी सुरू करा, असे खात्यांना परिपत्रकातून बजावण्यात आले आहे.
दरम्यान अनेक महिने हजेरी नोंदणी मशीने बंद राहिल्याने काही मशीन सुरूच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यांची देखरेख कोणीच केली नाही, असेही दिसून आल्यामुळे ती आता दुरुस्त करण्याची पाळी सरकारवर आली आहे.