प्रतिनिधी / सोलापूर
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्या फ्रान्स सरकार विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने आज रविवारी सोलापुरात निदर्शने करण्यात आली. प्रेषित पैगंबर यांना बदनाम करणाऱ्या व इस्लाम धर्म बदनाम करणाऱ्या फ्रान्स सोबत बायकॉट करा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज एमआयएमच्या वतीने ई-मेल द्वारे पाठविण्यात आल्याची माहिती एमआयएमचे शहराध्यक्ष फारूख शाब्दी यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्रपती मायक्रोन यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरून बदनामी केल्याप्रकरणी भारतासह जगभरात विरोध होत आहे. दरम्यान आज एमआयएम पक्षाच्यावतीने फ्रान्सचा राष्ट्रपती विरोधात सोलापुरात निदर्शने करण्यात आली. भारत देशाने बिझनेस, राजकारण, सोशल यावर संबंध तोडावे, सर्वांनी फ्रान्स सरकारचे बायकॉट करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गटनेता रियाज खरादी, नगरसेवक गाजी जहागीरदार, वहिदा भंडाले, सत्तार शेख, हरीश कुरेशी मतीन शेख, अजित शेख, रहमान मोहोळकर, मोसिन मैंदर्गी, उम्मो शेख, नावेद उस्ताद, इस्मोउद्दीन शेख यासह एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इस्लामला बदनाम करण्याचे काम बंद करा
फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरून मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सला बायकॉट करून त्यांची कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करू नये. इस्लाम धर्माला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे थांबवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी फ्रान्सच्या विरोधात शांततेत निदर्शने करावी. – फारुख शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएम