तक्रार देण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
मिरज / प्रतिनिधी
मुस्लिम धर्मियांचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी शनिवारी रात्री साडेआठ नंतर मिरज शहरात तणाव निर्माण झाला. तक्रार देण्यासाठी मुस्लिम समाजातील अनेक तरुण मिरज शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले. सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम समाजातील तरुणांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र सण असलेल्या रमजान महिन्यातील रोजे सुरू असताना हा प्रकार घडल्याने शहर आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
शनिवारी दुपारपासून व्हाट्सअप वर मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर वायरल होत होता. सदर मेसेज कोणाकडून आला याबाबत कोणासही माहिती नव्हती. मात्र आक्षेपार्ह मजकूर असल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. त्यामुळे रात्री आठ वाजता संबंधित व्हायरल झालेला मजकूर घेऊन मुस्लिम समाज बांधव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत होती. त्यामुळे शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम तरुणांचा मोठा घोळका जमला होता. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी मुस्लीम तरुणांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याची ग्वाही तरुणांना दिली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अधिकृत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या प्रकारानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.