कंग्राळी बुद्रुक येथे मराठी भाषा दिन, कविवर्य वि. वि. शिरवाडकर जयंती-सत्कार सोहळा : माध्यमिक विद्यालय-गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत एकनाथ व कविवर्य वि. वि. शिरवाडकर या महनिय पुरुषांनी मराठी भाषा व संस्कृतीची ज्योत आजतागायत तेवत ठेवली आहे. तसेच सर्व हिंदुधर्मियांसह सर्वांनी इतर भाषांचाही मानसन्मान ठेवला आहे. त्यांचे हे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी जीवनात यशस्वी होण्याचे मनोगत कंग्राळी बुद्रुक येथील विश्वभारत सेवा समिती संचालित माध्यमिक विद्यालयाचे मराठी विषयाचे सहशिक्षक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
कंग्राळी बुद्रुक येथील विश्वभारत संचालित माध्यमिक विद्यालय व गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानपीठ विजेते कविवर्य वि. वि. शिरवाडकर यांची जयंती, मराठी भाषा दिन व सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत
होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एल. जाधव होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती ‘तरुण भारत’चे कंग्राळी विभाग वार्ताहर सदानंद चव्हाण, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एन. हुलगबाळी, सहशिक्षक जे. एल. जैनर, सहशिक्षक जोगण्णावर, मराठी विषयाची सहशिक्षिका जी. डी. पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी इयत्ता दहावी व आठवीच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. शाळेतील सर्व सहशिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन, बी. एस. पाटील यांच्या हस्ते कविवर्य वि. वि. शिरवाडकर प्रतिमा पूजन, जोगण्णावर सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. सहशिक्षिका जी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी शाळेच्या शिक्षकवृंदांच्या हस्ते उपस्थित सत्कारमूर्तींचा शाल व फळांची टोपली देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांची भाषणे-सांस्कृतिक कार्यक्रम
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी धनश्री हुद्दार, भूमिका निलजकर, तन्वी पाटील, वैभवी अष्टेकर, करुणा कागणकर प्रिती नाईक यांनी शौर्यगीते, भक्तीगीते, गौळणी, रंगीबेरंगी वेशभूषेमध्ये सादर केली.
गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांचे मराठी भाषाप्रेम अतुलनिय मराठी भाषा दिनाबद्दल मनोगत व्यक्त करताना सदानंद चव्हाण म्हणाले, परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी विश्वभारत सेवा समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात गावोगावी हायस्कूल काढून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षित तर केलेच, शिवाय अनेक मराठी भाषिक, कन्नड भाषिक, उर्दु भाषिक शिक्षकांना नोकऱया देऊन शिक्षकांच्या माध्यमातून मराठी भाषा वाढविल्याचे महान कार्य केले आहे. यावेळी मुख्याध्यापक एम. एम. हुलगबाळी, मुख्याध्यापक जे. एल. जाधव यांनीही मराठी भाषा दिन व कविवर्य वि. वि. शिरवाडकर यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शशिकांत अष्टेकर, एस. बी. लाड, एस. आय. माडुलकर, पुजा पाटीलसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहशिक्षक गजानन खांबले यांनी केले. सहशिक्षिका आर. सी. पाटील यांनी आभार मानले.