दागिने, रोकडसह 21 लाखांचा ऐवज लांबविला
प्रतिनिधी/ बेळगाव
नववर्षात चोऱया-घरफोडय़ांचे सत्र सुरू झाले आहे. महांतेशनगर येथील एका सोसायटीचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 30 तोळय़ांचे दागिने व 6 लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे 21 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.
महांतेशनगर येथील चन्नम्मा को-ऑप. सोसायटीत चोरीचा हा प्रकार घडला असून सोसायटीत तारण ठेवलेले 30 तोळे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी चोरले आहेत. या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, इंडाल कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी चार घरफोडय़ा झाल्या आहेत. यासंबंधी रविवारी रात्री माळमारुती पोलिसांशी संपर्क साधला असता हिंडाल्को कंपनीत काम करणाऱया एका कामगाराच्या घरात चोरी झाली असून उर्वरित घरात चोरीचा केवळ प्रयत्न झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
उपनगरांमध्ये चोऱया-घरफोडय़ा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांच्या ठशांचे नमुने घेतले असून या दोन्ही घटनांचा तपास करण्यात येत आहे. यामागे कोणते गुन्हेगार कार्यरत आहेत, याचा सुगावा पोलिसांना लागला असून लवकरच या दोन्ही चोऱयांचा छडा लावण्याचा विश्वास अधिकाऱयांनी बोलून दाखविला.