ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जारी करण्यात आलेले लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी वाहनांना बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोलची किंमतीत 54 पैसे तर डिझेलच्या किमतीत 58 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत 72.46 रुपयांवरून 73 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 70.59 रुपयांवरून 71.17 रुपये झाली आहे.
कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 74.98, 80.1 आणि 77.8 इतकी वाढली आहे. तर डिझेलसाठी या महानगरांना आता 67.23, 69.92 आणि 69.74 रुपये मोजावे लागणार आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता अशा प्रकारे दररोज पेट्रोल – डिझेलच्या किंमती बदलत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोना संकटाबरोबरच सामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.