आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या अनेक देशात आगडोंब
कुठे 10 हजाराला सिलिंडर, तर कुठे मिरची प्रतिकिलो हजारवर
संपूर्ण जगावर कोविड-19चे आलेले संकट आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे काही देश संकटाच्या उंबरठय़ावर आले आहेत. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि श्रीलंका हेदेखील यापासून वाचलेले नाहीत. काही देशात सिलिंडरची किंमत 10,000 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे, तर काही देशात मिरचीची किंमत 710 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे जगभरातील काही देश आणि तेथील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. बरेच देश खूप मोठय़ा प्रमाणात महागाईचा सामना करत आहेत. दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाच्या किमती झपाटय़ाने वाढत असल्याने लोकांची झोप उडाली आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार कोविड-19 सुरू झाल्यापासून पाच लाख लोक दारिद्रय़रेषेखाली गेले आहेत.
पाकिस्तान ः पाकिस्तानातील एलपीजीच्या किमती पाहून लोक हैराण झाले आहेत. देशात घरगुती सिलिंडरची किंमत 2,560 रुपयांवर पोहोचली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 9,847 रुपये झाली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये दुधाची किंमत प्रतिलिटर 150 च्या घरात पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये साखरेचे दर 100 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर गव्हाचे भाव किलोमागे 40 रुपयांवरून 70 रुपये किलो झाले आहेत. एवढेच नाही तर मटण, चिकन, डाळी इत्यादी वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत.
श्रीलंका ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. श्रीलंकेत नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान अन्नधान्य महागाई 15 टक्क्मयांनी वाढली असून भाज्यांचे वाढलेले भाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम मिरचीची किंमत श्रीलंकेच्या रकमेनुसार 18 रुपये वरून 710 रुपये झाली आहे. एवढेच नाही तर देशात एक किलो बटाटय़ाची किंमत 200 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच वांग्याचा भाव 160 रुपये किलो, भेंडी 200 रुपये आणि गाजर 200 रुपये किलोवर पोहोचला आहे.
व्हेनेझुएला ः दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्ये 2021 मध्ये वार्षिक महागाई दर 686.4 टक्के होता. 2020 मध्ये देशातील महागाईचा दर 2,959.8 टक्क्मयांवर पोहोचला होता. त्यामुळे खाद्यपदार्थ खूप महाग झाले आणि लोक त्याविरोधात रस्त्यावर आले. 2019 मध्ये देशात 5 टोमॅटोची किंमत व्हेनेझुएलच्या चलनानुसार 5 लाख बोलिव्हरवर पोहोचली होती. तसेच येमेन आणि सीरियामध्ये खाण्यापिण्याचे सामान खूप महाग झाले आहे.
सीरिया ः सीरियामध्ये इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे भाज्या आणि फळांच्या किमती 15 टक्क्मयांहून अधिक वाढल्या आहेत. देशात अनुदानाशिवाय डिझेल 1700 सीरियन पौंडांवर पोहोचले आहे. देशातील महागाईची परिस्थिती तीव्र झाल्यानंतर गेल्या वषी सीरियाने पाच हजार सीरियन पौंडांच्या नोटा जारी केल्या. तरीही महागाई नियंत्रणात आलेली नाही. आफ्रिकन देश सुदानमध्ये देखील महागाई शिगेला पोहोचली आहे. देशात साखर आणि गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.