चन्नम्मा चौक येथे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरामध्ये अचानकपणे भरमसाठ वाढ केली आहे. सिलिंडरसह पेट्रोल व डिझेल, खाद्यतेले तसेच इतर जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे, असा आरोप करत आम आदमी पार्टीने कित्तूर चन्नम्मा चौक येथे निदर्शने करून जोरदार आंदोलन केले. केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढुन तीव्र निषेधही नोंदविला आहे.
आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीमध्ये विविध सवलती देत आहे. मोफत शिक्षण, मोफत वीज, मोफत पाणी यासह इतर सुविधा उपलब्ध केले आहे. असे असताना केंद्र सरकार मात्र देशातील जनतेला वेठीस धरत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास जीवन जगणे कठीण जाणार आहे. त्यामुळेच आम्ही केंद्र सरकारचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
कित्तूर चन्नम्मा चौक येथे केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी अनीस सौदागर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..