पुणे / प्रतिनिधी :
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘रिव्हीजिटिंग गांधी’ राष्ट्रीय कार्यशाळेसाठी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना दिलेले आमंत्रण हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावापोटी रद्द करायला लावण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेबाबत पुण्यासह राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत असून, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तषी यांनी प्रकुलगुरू डॉ. उमराणी यांचा निषेध केला आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मॉडर्न महाविद्यालयात 7, 8 फेब्रुवारी रोजी ‘रिव्हीजिटिंग गांधी’ या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना उद्घाटक, वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन यांना बीजभाषणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. 6 रोजी म्हणजे अचानक तुषार गांधी, राजन यांना हे निमंत्रण रद्द केल्याने आपण येऊ नका, असा निरोप संयोजकांकडून देण्यात आला.
याबाबत डॉ. कुमार सप्तषी यांनी अधिक माहिती घेतली असता, पतीत पावन संघटना, प्रदीप रावत यांनी तुषार गांधी, अन्वर राजन यांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्यामार्फत दबाव आणल्याची माहिती मिळाली.