कोलकार भाजीमार्केट लिलाव प्रक्रियेलाही स्थगिती
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्या विविध भागांतील व्यापारी संकुलातील गाळे लीजवर लिलाव करण्यात येणार होते. येथील महात्मा फुले भाजीमार्केट आणि कोलकार मार्केट येथील गाळय़ांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. त्या गाळय़ांचादेखील लिलाव करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला होता. मात्र अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने त्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याने महात्मा फुले भाजीमार्केट व कोलकार भाजीमार्केटमधील गाळेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भाजीमार्केटमधील गाळेधारक गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. गाळा क्रमांक 3 ते 23 पर्यंतच्या सर्वांना स्थगिती मिळाली आहे. याचबरोबर कोलकार मार्केटमधील 7 गाळेधारकांना स्थगिती मिळाली आहे. याबाबत पुढील सुनावणी 30 जून 2022 रोजी होणार आहे. त्यामुळे या संकुलातील गाळेधारकांना सध्या दिलासा मिळाला आहे.
येथील व्हॅकेशन जिल्हा न्यायालयामध्ये या सर्वांनी स्थगिती मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली आणि न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 1986 पासून या सर्वांकडे गाळय़ांचा कब्जा आहे. तेव्हापासून योग्यप्रकारे भाडे महानगरपालिकेला त्यांनी दिले आहे. 5 टक्के त्यामध्ये वाढ करण्याचे असते. त्यानुसार गाळेधारकांनी भाडेवाढदेखील दिली आहे. असे असताना अचानकपणे महापालिका गाळय़ांचा लिलाव करून या व्यावसायिकांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास ऍड. एम. बी. पाटील यांनी आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने सध्या या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
महात्मा फुले भाजीमार्केटमधील गाळेधारक दीपक कलघटगी, जोतिबा सप्ले, गिरीश पाटणकर, राजेंद्र कलघटगी, सदानंद हावळ, खादरबाशा अत्तार, तेजुद्दीन हंचनमनी, इजाजअहम्मद शेख, वासीम सौदागर, अब्दुलगणी मुजार, अष्पाक पाचापुरी, मोहसीन पाचापुरी, राहुल बाळेकुंद्री, एम. ए. पाचापुरी यांच्यासह इतरांनी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली आहे.