लंडन / वृत्तसंस्था
इंग्लंडचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांना ब्रिटीश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे सदस्य म्हणून सन्मानित करण्यात आले. 64 वर्षीय बोथम यांच्यासह 36 सदस्यांना हा सन्मान लाभला. माजी कर्णधार राहिलेल्या इयान बोथम यांनी 1977 ते 1992 या कालावधीत इंग्लंडतर्फे 102 कसोटी सामने खेळले असून ते ब्रेक्झिटचे तगडे समर्थक मानले गेले आहेत. 2007 मध्ये त्यांना क्रिकेट व समाजकार्य या आघाडय़ांवर दिलेल्या योगदानाबद्दल नाईट पदवीही प्रदान करण्यात आली होती.
हाऊस ऑफ लॉर्डसच्या सदस्यत्वाचा सन्मान लाभणारे बोथम 2011 नंतरचे पहिलेच क्रिकेटपटूही ठरले. 9 वर्षापूर्वी माजी इंग्लिश महिला कर्णधार रॅशेल हेहो-फ्लिन्ट यांना हा सन्मान लाभला. त्यापूर्वी, डेव्हिड शेफर्ड, कॉलिन कॉड्री व लियरी कॉन्स्टन्टाईन हे देखील हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या सदस्यत्त्वाचे मानकरी ठरले आहेत.
1981 मध्ये इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेसमध्ये सनसनाटी विजय मिळवून दिला, हा बोथम यांचा सर्वात मोठा पराक्रम मानला जातो. बोथम यांनी निवृत्त झाल्यानंतर समाजकार्यात झोकून दिले. रक्ताच्या रोगावर संशोधन करण्यासाठी निधी मिळवून देण्याचा उपक्रम त्यांनी जोमाने राबवला. याशिवाय, ते सातत्याने क्रिकेट सामन्यांचे समालोचन देखील करत आले आहेत.