अवघ्या फुटबॉलविश्वावर शोककळा, महान खेळाडूच्या : निधनाने अपरिमित हानी, अर्जेन्टिनामध्ये 3 दिवसांचा दुखवटा
वृत्तसंस्था / ब्युनोस आयर्स
जागतिक स्तरावरील सर्वात महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या अर्जेन्टिनाच्या दिएगो माराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 1986 मध्ये अर्जेन्टिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला, हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा माईलस्टोन ठरला. 1986 मधील स्पर्धेतच इंग्लंडविरुद्ध लढतीत त्यांनी केलेला ‘हँड ऑफ गॉड’ गोल तब्बल 4 दशके सातत्याने चर्चेत राहिला आहे.
माराडोना यांची प्रकृती अलीकडील बऱयाच कालावधीपासून ठीक नव्हती. दोन आठवडय़ांपूर्वीच मेंदूतील रक्ताच्या गाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री 10 च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अर्जेन्टिनाचा माजी आक्रमक मिडफिल्डर व मॅनेजर म्हणून माराडोनानी जी लोकप्रियता मिळवली, त्याला तोड नाही. आपल्या क्लब कारकिर्दीत माराडोना यांनी बार्सिलोना व नापोली या संघांचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, इटालियन संघातर्फे 2 सिरी ए जेतेपदेही संपादन केली. माराडोना यांनी अर्जेन्टिनातर्फे 91 सामने खेळत त्यात 34 गोल केले. शिवाय, 4 विश्वचषक स्पर्धांही खेळल्या.
1990 मधील विश्वचषक फायनलमध्ये पश्चिम जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी माराडोनाकडेच अर्जेन्टिनाच्या नेतृत्वाची धुरा होती. 1994 विश्वचषक स्पर्धेत ते अमेरिकेत पुन्हा एकदा कर्णधारपदी होते. मात्र, त्यावेळी इफेड्राईन या उत्तेजकाचे सेवन केल्याचे आढळून आल्याने त्यांना मायदेशी धाडले गेले होते.
आपल्या कारकिर्दीच्या दुसऱया टप्प्यात माराडोना कोकेनच्या व्यसनामुळे सातत्याने झगडत राहिले आणि 1991 मध्ये पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर 15 महिन्यांची बंदी लादली गेली. 1997 मध्ये माराडोना व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त झाले. आपल्या 37 व्या वाढदिनीच त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी ते क्लब स्तरावर अर्जेन्टिनाच्या बोका ज्युनियर्स संघातर्फे खेळत होते.
आपल्या कारकिर्दीतील क्लब फुटबॉल त्यांनी इटलीत खेळले. चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा पाठीशी असताना त्यांनी 1987 व 1990 मध्ये लीग विजेतेपदे तर 1989 मध्ये युफा चषक जिंकून देत सुवर्ण झळाळीचा प्रत्यय आणून दिला होता.
खेळत असताना अर्जेन्टिनाच्या दोन क्लबचा कार्यभार हाताळणाऱया माराडोना यांना 2008 मध्ये राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यांनी 2010 विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्या स्पर्धेत अर्जेन्टिनाला उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. संयुक्त अरब अमिरात व मेक्सिकोतील संघांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले तर मृत्यूच्या उंबरठय़ावर असताना अर्जेन्टिनातील जिम्नॅशिया इस्ग्रिमा संघाचे प्रशिक्षकपद ते भूषवत होते. अवघे 16 वर्षे व 120 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱया माराडोना यांच्या निधनाने फुटबॉल विश्वात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
बालपण गरिबीत गेले, पण, साऱयावर मात केली
8 मुलांमध्ये 5 वे असलेल्या माराडोना यांचे बालपण गरिबीत गेले. ब्यूनॉस आयर्सच्या बाहेरील भागात अगदी चिखलात त्यांनी फुटबॉल खेळले आणि यात दैवी गती लाभत गेल्यानंतर त्यांनी अवघ्या जागतिक विश्वाला आपल्या खेळाच्या मोहात पाडले. 2001 मध्ये फिफाने माराडोना यांना पेले यांच्यासह फुटबॉल इतिहासातील दोन महानतम खेळाडू म्हणून सन्मानित केले. माराडोनाच आम्हाला प्रेरणा द्यायचे, असे अर्जेन्टिना स्ट्रायकर कार्लोस तेवेझने एकदा म्हटले होते.
1980 च्या दशकात माराडोना यांनी देशात व विदेशातही विलक्षण यश प्राप्त केले. अर्जेन्टिनाच्या अर्जेन्टिनोस ज्युनियर्स व बोका ज्युनियर्स यांच्यासह त्यांनी स्पॅनिश व इटालियन संघांचे देखील प्रतिनिधीत्व केले. 1986 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीविरुद्ध 3-2 व त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध 2-1 अशा फरकाने विजय मिळवून देण्यात त्यांचे योगदान शब्दशः ऐतिहासिक ठरले.
यातील इंग्लंडविरुद्ध लढतीत इंग्लिश गोलरक्षक पीटर शिल्टॉनने आपला निषेध नोंदवला होता. पण, तरीही रेफ्रीनी माराडोना यांच्या गोलचा निर्णय कायम ठेवला. नंतर माराडोना यांनी आपण जाणूनबुजून चेंडूला स्पर्श केल्याचे कबूल केले होते. अर्थात, या कबुलीनंतरही माराडोना चाहत्यांच्या गळय़ातील ताईतच राहिले. इंग्लंडविरुद्ध मिळवलेला हा विजय म्हणजे 1982 मधील फॉकलँड आयलंडवरुन झालेल्या युद्धातील पराभवाचा सूडच, असे अनेक अर्जेन्टिनियन नागरिकांना वाटायचे, त्यावरुन देखील त्यांची महती कळते.
1978 च्या संघातून वगळले गेले, ही आपली सर्वात मोठी शोकांतिका होती, असे माराडोना यांनी एकदा म्हटले होते. अर्जेन्टिनाने मायदेशातील ती स्पर्धा जिंकली. पण, अवघ्या 17 वर्षांचे असल्याने माराडोना यांना संधी देण्यात आली नव्हती. माराडोना यांनी 1976 ते 81 या कालावधीत फर्स्ट डीव्हिजन क्लब अर्जेन्टिनोस ज्युनियर्सचे व नंतर बोका ज्युनियर्सचे प्रतिनिधीत्व केले. बार्सिलोनाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर पुढे बार्सिलोनाने त्यांची विक्री इटलीतील नापोली संघाला केली. नापोली संघाला त्यांनी आपल्या कारकिर्दीत स्वप्नवत यश मिळवून दिले होते.
1991 मध्ये उत्तेजक सेवनाचे गुपित फुटले
माराडोना यांचे 1991 मध्ये पहिले डोपिंग स्कँडल बाहेर पडले, ज्यावेळी त्यांनी स्वतः आपण कोकेनचे सेवन करत होतो, अशी जाहीर कबुली दिली. 1997 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी निवृत्त होईतोवर त्यांचे उत्तेजक सेवन सुरुच राहिले. 2000 मध्ये त्यांना इस्पितळात तातडीने दाखल व्हावे लागले व 2004 मध्ये पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा सामना करावा लागला. पुढे त्यांनी कोकेन सोडले असल्याचा दावा केला आणि त्याचवेळी ते म्हणाले होते, उत्तेजक सेवन हाच माझा सर्वात कठीण प्रतिस्पर्धी आहे.
अर्थात, नंतरही त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरुच राहिल्या होत्या. 2005 मध्ये गॅस्ट्रिक बायपासनंतर त्यांचे वजन कमालीचे घटले. त्यांना 2007 मध्ये पुन्हा ऍक्यूट हेपॅटिटिसमुळे इस्पितळात भरती व्हावे लागले. त्यावेळी डॉक्टरांनी माराडोना यांच्या अति आहार व अति मद्यसेवनाकडे अंगुलीनिर्देश केले होते. 2008 मध्ये अर्जेन्टिनाचे प्रशिक्षक या नात्याने त्यांनी अनपेक्षित पुनरागमन केले. पण, 2010 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाने अर्जेन्टिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि माराडोना यांनाही मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार व्हावे लागले. नंतर ते संयुक्त अरब अमिरातमधील क्लब अल वस्लचे प्रशिक्षक म्हणून रुजू झाले होते.
दृष्टिक्षेपात माराडोना यांची कारकीर्द
- 1977 : अर्जेन्टिना वि. हंगेरी लढतीतून पदार्पण
- 1982 : बार्सिलोनानंतर नापोली संघात दाखल
- 1986 : अर्जेन्टिनाला विश्वचषक जिंकून दिला
- 1990 : विश्वचषक स्पर्धेत अर्जेन्टिना उपविजेते
- 1991 : उत्तेजक सेवनात दोषी, 15 महिन्यांची बंदी
- 1994 : चौथ्या वर्ल्डकपमधून उत्तेजक सेवनामुळे बाहेर
- 1997 : पुन्हा उत्तेजक सेवनात दोषी, निवृत्तीची घोषणा
- 2010 : अर्जेन्टिना मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा
माराडोना डावखुरे, खेळ मात्र फुटबॉल विश्वात ‘उजवा’
साहसी, वेगवान व तितक्याच अंदाज देऊ न शकणाऱया खेळामुळे माराडोना अर्थातच, चाहत्यांच्या गळय़ातील ताईत होते. मास्टर ऑफ ऍटॅक म्हणून त्यांची ओळख जनमानसात रुजली. माराडोना हे डावखुरे. पण, दोन्ही पायांनी तितक्याच चपळतेने खेळणाऱया या महान खेळाडूने आपल्या असंख्य प्रतिस्पर्ध्यांना लीलया चकवा दिला, त्याला तोड नाही. माराडोना हे स्वतः डावखुरे असले तरी त्यांचा खेळ मात्र सातत्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ‘उजवा’च ठरला.
10 क्रमांकाची जर्सी हीच माराडोनाची खास ओळख
एक काळ असाही राहिला, ज्यात अर्जेन्टिना संघाचा पूर्ण खेळ माराडोना यांच्याभोवतीच केंद्रित राहिला. माराडोना यांना सूर सापडला तर त्यांना रोखणे निव्वळ कठीण, याची अवघ्या फुटबॉल विश्वाला पुरेपूर कल्पना होती. साहजिकच, 10 व्या क्रमाकांची जर्सी परिधान करुन माराडोना मैदानावर उतरायचे, तो क्षण डोळय़ात साठवून ठेवण्यासाठी फुटबॉल चाहते अक्षरशः वेडे होत असत.
पेले व माराडोना….दोघेही तितकेच महान!
ब्राझिलियन महान फुटबॉलपटू पेले व दिएगो माराडोना यांचा खेळण्याचा कालखंड जवळपास समसमानच आणि यामुळे साहजिकच, त्यांच्यात बरीच तुलना होत राहिली. पेले महान की माराडोना ही चर्चा तर सातत्याने रंगायची. पण, हे दोघेही महान खेळाडू राहिले. त्यांनी आपापल्या शैलीने, आपापल्या अव्वल दर्जाच्या खेळाने अवघ्या फुटबॉल विश्वाला मोहित केले.
अखेरच्या श्वासापर्यंत व श्वासानंतरही ते गोल्डन बॉयच राहिले
अर्जेन्टिनासाठी व अवघ्या फुटबॉल विश्वासाठी माराडोना ‘पिबे दे ओरो’ अर्थात गोल्डन बॉय ठरले. स्वतः माराडोना यांच्या 2 दशकातील कारकिर्दीत देखील हाच त्यांच्यासाठी सुवर्णक्षण ठरल्याचे स्पष्ट झाले. उत्तेजक, कोकेनचे व्यसन त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लावणारे ठरले. पण, तरीही त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख कधीही खाली घसरला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते गोल्डन बॉयच राहिले.
1986 मधील ‘हँड ऑफ गॉड’ गोल
1986 फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध खेळताना माराडोना यांच्या हाताला स्पर्शून चेंडू गोलजाळय़ात गेला आणि हाच क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
अर्जेन्टिनात तीन दिवसांचा दुःखवटा, फुटबॉल विश्वावर शोककळा
अर्जेन्टिनाचा व अगदी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या दिएगो माराडोनाच्या निधनाने अर्जेन्टिनासह अवघ्या फुटबॉल विश्वावर शोककळा पसरली आहे. अर्जेन्टिना अध्यक्षांच्या कार्यालयाने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर केला तर अर्जेन्टिना सॉकर संघटनेने ट्वीटरवरुन माराडोना यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
उंची अवघी 5 फूट 5 इंच. पण, तरीही ते पुरुन उरले!
अवघ्या 5 फुट 5 इंच उंचीच्या माराडोनानी कमी उंचीचा देखील आपल्या कारकिर्दीत पुरेपूर लाभ घेतला. चेंडू सफाईने हाताळत प्रतिस्पर्ध्यांना चकवा देण्यात आणि गोलजाळय़ावर आक्रमण करण्यात त्यांचा हात कोणीही धरु शकणार नाही, इतका त्यांचा लौकिक राहिला. आपल्या कारकिर्दीच्या दुसऱया टप्प्यात बलुनिंग वेस्टलाईनमुळे माराडोना यांचा वेग जरुर कमी झाला. पण, त्यांच्या खेळातील नजाकत मात्र कधीच कमी झाली नाही.
सॅल्वातोर म्हणाले होते, माराडोना पायाने नव्हे तर मेंदूने खेळायचे!
माराडोना यांचा खेळ निव्वळ स्वप्नवत असतो. खरं सांगायचे तर ते पायाने नव्हे तर अक्षरशः युक्तीने अर्थात मेंदून खेळायचे, हे उद्गार आहेत सॅल्वातोर बॅग्नी यांचे. बॅग्नी यांनी इटालियन क्लब नापोलीत माराडोना यांच्यासमवेत काही काळ व्यतित केला. त्यावेळी त्यांनी माराडोना यांना जवळून अनुभवले होते.