नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर बेंगळुरातील एका इस्पितळात उपचार सुरु आहेत. 65 वर्षीय प्रकाश पदुकोण प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय ठरले असून 1980 साली त्यांनी हा पराक्रम गाजवला होता. या आठवडय़ाच्या अखेरीस त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.
‘साधारणपणे 10 दिवसांपूर्वी, प्रकाश पदुकोण, त्यांची पत्नी उज्ज्वला व दुसरी कन्या अनिशा यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आणि चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले’, असे पदुकोण यांचे निकटवर्तिय विमल कुमार यांनी नमूद केले. विमल कुमार हे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक देखील आहेत.
‘प्रारंभी, या तिघांनीही स्वतःला आयसोलेट करुन घेतले होते. पण, प्रकाश पदुकोण यांचा ताप एका आठवडय़ानंतर देखील कमी झाला नाही. त्यामुळे, त्यांना इस्पितळात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते सध्या पूर्ण बरे आहेत. त्यांचे सर्व पॅरामीटर्सही व्यवस्थित आहेत. त्यांची पत्नी व कन्या घरीच आहेत आणि स्वतः प्रकाश यांनाही येत्या 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल’, असे विमल कुमार यांनी पुढे बोलताना नमूद केले.
जागतिक बॅडमिंटनमधील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असलेल्या प्रकाश पदुकोण यांनी 1970 ते 1980 चे दशक गाजवले व या दोन्ही दशकातील ते रोल मॉडेल देखील बनले. 1983 च्या आवृत्तीत कांस्य जिंकल्यानंतर ते वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकाची कमाई करणारे पहिले भारतीय देखील ठरले होते. 1980 मध्ये डेन्मार्क ओपन, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप व स्वीडिश ओपन स्पर्धा लागोपाठ जिंकून जागतिक स्तरावर अव्वल मानांकन प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. 1991 मध्ये निवृत्ती स्वीकारल्यांनतर पदुकोण यांनी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. याशिवाय, 1993 ते 1996 या कालावधीत ते भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत.