प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहणे काळाची गरज आहे. केवळ घरकाम करणाऱया महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. कोणतीही भीती अथवा खंत न ठेवता महिलांनी स्वावलंबी व्हावे. तसेच आत्मरक्षणाचे धडे आत्मसात करावे, असे आवाहन महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी केले.
महापालिका कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन महिला दिनाचा आनंद घेतला.
महानगरपालिकेच्या कार्यालयात विविध समस्या आणि कामानिमित्त नागरिकांची ये-जा सुरू असते. यामुळे नेहमीच्या कामामधून वेळ काढणे मनपा कर्मचाऱयांना मुश्किल बनते. विशेषतः महिला वर्गाला ठरलेल्या वेळेत आपले कामकाज पूर्ण करावे लागते. यामुळे दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात. मात्र मंगळवारी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी सर्व महिलांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी 20 ते 40 वयोगटासाठी आणि 41 ते 59 वयोगटासाठी केशरचना, फॅन्सी डेस स्पर्धा, वीर योद्धा महिला वेशभूषा, डान्स स्पर्धा तसेच संगीत खुर्ची असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महिला दिनाचे उद्घाटन नगरयोजना अधिकारी बसवराज हिरेमठ, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर, आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, शहर अभियंते, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी आश्रममधील मुलांसाठी महिला वर्गाच्यावतीने विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित स्पर्धांमध्ये महिलांनी भाग घेतला होता.