सातपैकी सहा ठिकाणी विजय- भाजपला धक्का
चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. सातपैकी सहा महापालिकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. बठिंडा, होशियारपूर, कपूरथाला, अबोहर, पठाणकोट आणि बटाला या महापालिकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. अजून एका महापालिका क्षेत्रातील मतमोजणी सुरू असून आता गुरुवारीच अंतिम निकालाची घोषणा केली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱयांकडून जाहीर करण्यात आले.
कृषी कायद्यांवरुन आक्रमक आंदोलन सुरु असताना पंजाबमध्ये 14 फेब्रुवारीला 109 नगपालिका, नगर पंचायत आणि सात महापालिका निवडणुकीसाठी मतदान झाले होते. एकूण 71.39 टक्के मतदानाची नोंद झाली होती. बठिंडातील निकाल भाजपासाठी खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या बाजीमुळे येथे भाजपसह शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षाच्या पदरी निराशा पडली आहे.
बठिंडाची निवडणूक ठरली प्रतिष्ठेची
बठिंडा पालिकेतील निकाल हा सर्वात आश्चर्यचकित करणारा असून जवळपास 53 वर्षांनी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आहे. बठिंडा लोकसभेचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत बादल करत असून नुकतेच कृषी कायद्यांच्या मुद्यावरुन त्यांनी मित्रपक्ष भाजपासोबतची युती तोडली होती. काँग्रेस आमदार आणि राज्याच्या अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल बठिंडा विधानसभेचे नेतृत्व करतात. त्यांच्यासाठी ही पालिका निवडणूक प्रति÷sची ठरली होती.